Saturday, March 21, 2020

कृष्ण मंदिर

  
 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे श्री गोवर्धन गिरिधारी अशा श्री गोपाल कृष्णाचे एक पुरातन व भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर दुमजली असून दीक्षित कुटुंबाकडे याच्या देखभालीची जबाबदारी आहे. उत्तर भारतातून आयात केलेली हि शालीग्रमाची मनोरम मूर्ती चित्तवेधक आहे.अशाच धाटणीच्या मुर्त्या मोहाडी व शिरवाडे वणी या गांवात आहेत.ह्या प्रत्येक मूर्तीच्या वेगळ्या घडणीमुळे ह्या मूर्ती भारतात एकमेव समजल्या जातात.
        चांदवडमधील श्रीकृष्णाच्या मूर्तीस दोन हात असून उजवा हात कमरेवर ठेवला आहे.तर डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेले आहे.म्हणून ह्या मूर्तीस गोवाधन गिरिधारी असे म्हणतात.हातातल्या गोवर्धन पर्वतावर कल्पतरू,माकडे,गाई,झाडे,व मंदिर आहे.श्रीकृष्णाच्या डोक्यावर एक पिंड आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूस कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम,राम, कृष्णा, बुद्ध, व कल्की, असे दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेली आहे. या कोठेही दूसरा जोड नाही. श्रीकृष्णाने सोवळे परिधान केलेले असून प्रभूच्या चरणांजवळ गोप-गोपी नृत्य करत आहेत. श्रीकृष्णाची मूर्ती कमळाच्या फुलावर उभी असून जवळच देवर्षी नारद वीणा वाजवीत बसलेले आहेत.मूर्तीच्या उजव्या बाजूला एक गाय आपल्या वासराला वात्सल्याने चाटत उभी आहे, तर डाव्या बाजूला दुसरी गाय तिच्या पोटाची खळगी भरण्यात मग्न आहे. त्याखाली सात सोंडेचा हत्ती,चार घोड्यांचा रथ,व एक गवळण गाईला नमस्कार करत आहे.श्रीकृष्णाच्या डाव्या बाजूला दीड फुट उंचीची पण पांढर्याशुभ्र पाषाणाची राधिकेची मूर्ती उभी असून ती शृंगारीत आहे.दोन्ही मूर्त्यांच्या शेजारी प्रथमारंभी श्रीगणेशाची मूर्ती आहे.
        या मंदिराची व्यवस्था व पूजेचे काम हे होळकर काळापासून दीक्षित कुटुंबियांच्या हाती होते.त्यामुळे होळकरांनी त्यांना काही जमिनी पुजेची देणगी म्हणून दिल्याचे समजते. मंदिरात पूर्वापार चालत आलेला सोहळा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मोत्सव होय.श्रावण वद्य प्रतिपदेपासून ते श्रावण वद्य अष्टमी पर्यंत आठ दिवस रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प.की.श्री शांताराम बुवा लोणेरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सन १९५३ ते २०१३ सालापर्यंत झाला;सध्या त्यांचा नातू ह.भ.प.भूषण लोणेरकर त्यांच्या जागेवर कीर्तन करतो.७ दिवस श्रीकृष्णाच्या जन्मागोदरची कीर्तने सादर होतात व ८व्या दिवशी श्रीकृष्णजन्माची कीर्तने सादर होउन रात्री १२वाजेस श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा होतो.ह्या कार्यक्रमांना संपूर्ण गावातून आठही दिवस भाविकांची गर्दी असते.         अशा ह्या अनोख्या व एकमेव अशा उत्कृष्ट मूर्तींचे सौंदर्य बघण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या ह्या चांदवड नगरीला.....